साक्षीदार असल्याचा राग धरुन पती व पुतण्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी
चव्हाण कुटुंबियांच्या वतीने पोलीस उपाधीक्षकांना निवेदन
कोतवाली पोलीस स्टेशनला सादर करण्यात आले सीसीटिव्ही फुटेजचे पुरावे
नगर (प्रतिनिधी)- एका केसमध्ये साक्षीदार असल्याचा राग धरुन पती व पुतण्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी अनिता जितेंद्र चव्हाण व चव्हाण कुटुंबियांच्या वतीने पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर गुन्हा खोटा असल्याबाबतचे सीसीटिव्ही फुटेजचे पुरावे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आलेले असून, त्यांनी देखील केलेला तपास व पंचनाम्याचा अहवाल सादर करण्याबाबत आदेश देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अनिता जितेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पती जितेंद्र चव्हाण यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी चेतन रवींद्र निंदाने यांनी 307 सारख्या गंभीर गुन्ह्याची खोटी फिर्याद नोंदवली आहे. हा गुन्हा संपूर्ण खोटा असून, यामागे काही दिवसांपूर्वी अत्या/बहिण हिने 7 नोव्हेंबर रोजी रात्री लक्ष्मण सारसर, हर्षल सारसर, युवराज सारसर यांनी मारहाण व शिवीगाळ केली होती. त्यानुसार त्या तिघांवर तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यास मी व माझ्या पुतण्या हे साक्षीदार आहेत. याबाबत लक्ष्मण सारसर यांनी माझे पती जितेंद्र चव्हाण यांना ती केस मिटवून घेण्याबाबत विनंती केली. त्यावर माझे पती यांनी नकार दिला. त्यानंतर लक्ष्मण सारसर यांनी पवन पवार यांच्या मदतीने केस मागे घेण्यासाठी पुतण्या रोहन चव्हाण यास वारंवार धमक्या दिल्या. यासंदर्भात रोहनने 18 नोव्हेंबर रोजी पवन पवार यांच्याविरुद्ध फिर्याद देवून अदखलपात्र गुन्हा नोंदवलेला आहे.
कुटुंबीयांच्या जीवास धोका असल्याचे पोलीस अधीक्षकांना 19 नोव्हेंबर रोजी पती जितेंद्र चव्हाण यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर पुतण्या रोहन चव्हाण यांनी 21 नोव्हेंबर रोजी अर्ज केला होता, यावर काही कारवाई झालेली नाही. आमच्यावर टाकण्यात आलेल्या दबावाला दाद न दिल्यामुळे पवन पवार, लक्ष्मण सासर व त्याचे इतर साथीदारांनी कोतवाली हद्दीमध्ये खोटा गुन्हा दाखल केलेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर गुन्हा खोटा असल्याबाबतचे पुरावे कार्यालयात 19 डिसेंबर रोजी समक्ष भेटून सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डिंग व खोटा गुन्हा दाखल केल्याबाबतचे तक्रार अर्ज दिलेला आहे. त्यानंतर कोतवली पोलीस स्टेशनलाही सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलेले आहे. यावर पोलीस निरीक्षक यांनी 2 जानेवारी सदर गुन्ह्याचा तपास करुन घटनास्थळी येथील सीसीटीव्ही फुटेज घेतले. तसेच जितेंद्र चव्हाण व रोहन चव्हाण यांचे मोबाईल लोकेशन तसेच त्यांचे घटना घडल्या वेळी दिलेले सीसीटीव्ही फुटेजनुसार समक्ष जाऊन पंचनामे केलेले आहेत. त्याबाबतचा अहवाल सह्या, पुरव्यासह गोला केलेला आहे. दिलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये घटनास्थळी फिर्यादी याने कशाप्रकारे खोटा गुन्हा करण्याचा कट रचला आहे, यातून स्पष्ट दिसून येत आहे. फिर्यादी सोबत कोण कोण होते? याचे पुरावे देखील कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेले असल्याचे म्हंटले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करुन जितेंद्र चव्हाण यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे.