आजीबाईच्या दृष्टीसाठी साक्षात बाप्पा पावला

म्युकर मायकोसिसने एक डोळा गमावला, तर दुसऱ्या डोळ्याला काचबिंदूने आलेल्या अंधत्वावर मात

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या गणेशोत्सवानिमित्त नागरदेवळे येथे झालेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून सरुबाई हौसारे या ज्येष्ठ महिलेला नवदृष्टी मिळाली. कोरोनात म्युकर मायकोसिसच्या संसर्गाने एक डोळा गमवावा लागला. तर एका डोळ्याला काचबिंदू झाल्याने त्यांच्या जीवनात अंधत्व निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत फिनिक्सने त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करुन त्यांच्या अंधारलेल्या जीवनाला प्रकाशमान केले. या शिबिरातद्वारे आजीबाईच्या दृष्टीसाठी साक्षात बाप्पा पावला.
राहुरी तालुक्यातील सरुबाई हौसारे अत्यंत बिकट परिस्थितीत संघर्षमय जीवन जगत आहे. त्यांना कोरोनामध्ये म्युकर मायकोसिसच्या संसर्ग झाला होता. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मोठ्या प्रमाणात औषधोपचाराचा खर्च त्यांना पेलवला नाही. परिणामी त्यांना एक डोळा गमवावा लागला. एका डोळ्यावर जीवन सुरु असताना, दुसऱ्या डोळ्याला देखील काचबिंदू झाल्याने त्यांचे जीवन अंधकारमय बनले होते.
आर्थिक अडचण असल्याने दुसऱ्या डोळ्यावर देखील उपचाराचा खर्च बिकट बनला होता. अशा परिस्थितीत गणेशोत्सवानिमित्त फिनिक्स फाऊंडेशनने घेतलेल्या नेत्र तपासणी शिबिरात येण्यासाठी देखील सरुबाई यांच्याकडे पैसे नव्हते. उसनवारी करुन त्यांनी नागरदेवळे (ता. नगर) गाठले. शिबिरात सहभागी होऊन फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना सर्व हकीगत सांगितली. बोरुडे यांनी तात्काळ या आजीबाईच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी घेऊन हालचाली सुरु केल्या. तर शिबिरार्थींसह त्यांना पुणे येथे के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेला पाठविले. सरुबाई यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होवून त्या नुकतेच शहरात परतल्या असता जालिंदर बोरुडे यांनी त्यांचे स्वागत केले.
सरुबाई यांना नवदृष्टी मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्याचप्रमाणे इतर रुग्णांवर देखील मोतीबिंदू व काचबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.