आठरे पाटील स्कूलने विजेतेपद पटकावून फुटबॉलमध्ये ठरले चॅम्पियन
आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा मुलींमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल विजयी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे स्टेअर्स फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत 14 व 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघात आठरे पाटील स्कूलने विजेतेपद पटकावून चॅम्पियन चषकावर नाव कोरले. विजयी संघाच्या खेळाडूंनी मैदानावर एकच जल्लोष केला होता. तर 17 वर्षा आतील मुलींच्या संघात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने विजेतेपद पटकाविले.
14 वर्ष वयोगटात रंगलेल्या आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी स्कूल (एसी सेंटर) संघातील अंतिम सामन्यात आठरे पाटीलच्या अशोक चंद याने केलेल्या गोलने संघाला विजेतेपद मिळवून दिले. 1-0 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी झाला.
17 वर्षे वयोगटात अंतिम सामना आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी स्कूल (एसी सेंटर) यांच्यात अटातटीचा झाला. दोन्ही तुल्यबळ संघ शेवट पर्यंत एकमेकांना भिडले होते. पहिल्या हाफ मध्ये एकही गोल झाला नाही. दुसऱ्या हाफ मध्ये आर्मी स्कूल कडून वेदांत वाघ याने 1 गोल करुन आघाडी घेतली. तर शेवटच्या क्षणात आठरे पाटील स्कूल कडून भानू चंद या खेळाडूने 1 गोल करुन बरोबरी साधली. शेवटी वेळ संपल्याने सामना टाय ब्रेकरवर गेला. पेनल्टीवर आठरे पाटील कडून भानु चंद, गौरव आठरे, अभय थोरात, संग्राम गीते यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तर आर्मी स्कूल कडून पार्थ मस्कर, आयुष शिर्के यांनी प्रत्येकी 1 गोल केला. 4-2 गोलने आठरे पाटीलचा संघ विजयी झाला.
या स्पर्धेत 17 वर्षातील मुली विजयी श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल, उपविजयी कर्नल परब स्कूल व तृतीय क्रमांक आर्मी स्कूल (एसी सेंटर), 14 वर्षे मुले विजयी आठरे पाटील पब्लिक स्कूल, उपविजयी आर्मी स्कूल (एसी सेंटर), तृतीय ऑक्झिलियन कॉन्व्हेंट स्कूल आणि 17 वर्ष मुले विजयी आठरे पाटील पब्लिक स्कूल, उपविजयी आर्मी स्कूल (एसी सेंटर), तृतीय श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल संघाने बक्षीसे पटकाविली. टूर्नामेंट ऑफ द प्लेयरचा मानकरी आर्मी स्कूल (एमआयआरसी) चा खेळाडू सोहेल त्रिपुरा ठरला.
पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अमरजीत शाही, राष्ट्रीय खेळाडू वैशाली आढाव-पार्ले, उद्योजक आदेश भगत, डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे सहसचिव गोपीचंद परदेशी, उद्योजक हर्षल मिसाळ, ऑलम्पिक असोसिएशनचे जिल्हा सचिव शैलेश गवळी, स्टेअर्स फाउंडेशनचे अध्यक्ष विजूशेठ टायरवाले, उपाध्यक्ष डॉ. प्रताप पटारे, विन्सेंट फिलिप्स, डॉ. प्रशांत पटारे, आठरे पाटील पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू प्रशांत पाटोळे, अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे संचालक महेश आनंदकर, वैभव मनोदिया, मनीष राठोड, सिद्धार्थ वांद्रे, राष्ट्रीय कबड्डी पंच बळीराम सातपुते आदींसह खेळाडू, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांकाच्या संघांना चषक, मेडल व बक्षीस प्रदान करण्यात आले. स्पर्धेत मुलांमध्ये 14 वर्ष वयोगटात उत्कृष्ट खेळाडू- अशोक चंद (आठरे पाटील स्कूल), उत्कृष्ट डिफेंडर- सार्थक विभुते (आर्मी स्कूल), उत्कृष्ट गोलकीपर- अथर्व गिरजे (आठरे पाटील स्कूल), 17 वर्ष वयोगट उत्कृष्ट खेळाडू- भानु चंद (आठरे पाटील स्कूल), उत्कृष्ट डफेंडर- अम्मार शेख (श्री साई इंग्लिश), उत्कृष्ट गोलकीपर- आयुष शिर्के (आर्मी स्कूल एसी सेंटर), तसेच 17 वर्ष वगोगटातील मुलींमध्ये उत्कृष्ट खेळाडू निकिता रामावत (श्री साई इंग्लिश), स्वराली देशमुख (कर्नल परब स्कूल), उत्कृष्ट स्ट्रायकर- आरती कर्डिले (आर्मी स्कूल एसी सेंटर) या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे पंच म्हणून शशिकांत गायकवाड, ऋषी कनोजिया, जोयल पिल्ले, परेश म्याना, ओम दंडवते, प्रणव पंडित, सागर चेमटे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्टेअर्स फाउंडेशनचे सचिव प्रसाद पाटोळे, सहसचिव सुभाष कनोजिया, खजिनदार मयूर टेमक, सदस्य वृषाली पटेकर, निलेश हराळे, राहुल जोशी, अर्जुन खेकडे आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक मॅककेअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल व सहप्रायोजक म्हणून हिंदुस्तान टायर्स, अमर टेक्नोक्राफ्ट, साईदीप टायर रिमोल्डिंग स्पेशालिटी, त्रिमूर्ती मेटल, झुलेलाल फुटबॉल क्लब, स्पेशालिटी एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड, इस्टेल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, स्वामिनी सर्व्हिसेस यांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे रुपेश पस्पूल यांनी केले. आभार विन्सेंट फिलिप्स यांनी मानले.