अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाजवादीच्या वतीने निषेध
बहुजन समाजाची जाहीर माफी मागण्याची मागणी
देशात महापुरुषांचा अवमान करुन जातीय द्वेष पसरवला जातोय -आबिद हुसेन
नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा समाजवादी पार्टीच्या वतीने शहरात निषेध करण्यात आला. मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शाह यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. जय भीमचा नारा देऊन, शाह यांनी समस्त बहुजन समाजाची जाहीर माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन, आसिफ रजा, अल्ताफ लकडवाला, तन्वीर बागवान, शब्बीर खान, समीर शेख, दिलावर खान, मतीन खान, अजय भोसले, विजय गायकवाड, नितीन कसबेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आबिद हुसेन म्हणाले की, बाबासाहेबांच्या नावाला फॅशन म्हणणाऱ्या शाह यांनी स्वत:च्या विचारांची फॅशन तपासावी. त्यांनी बहुजनांचे कैवारी असलेल्या बाबासाहेबांचा पवित्र संसदेत अवमान केला आहे. भाजपच्या सत्तेत वारंवार महापुरुषांची अवमान केला जात आहे. तर जातीय द्वेष पसरवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार सुरु आहे. भाजप देखील अशा गोष्टींचे समर्थन करत असल्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या त्यांच्या नेत्यांवर कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले.