केडगावच्या सरस्वती प्राथमिक विद्यालयात रंगला बालक्रीडा मेळावा
विविध मैदानी स्पर्धेत खेळाडूंनी दाखवले कौशल्य
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा बालक्रीडा मेळावा शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवली.
बालक्रीडा मेळाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पेमराज सारडा कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख संजय धोपावकर, न्यू लॉ कॉलेजचे शारीरिक शिक्षण विभागाचे सुनील जाधव, आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू सीमा लाड,
संस्थेचे सह कोषाध्यक्ष आर.आर. पवार, बी.एड कॉलेजचे प्राचार्य अमरनाथ कुमावत सर,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य , ए.वाय. कुलकर्णी, प्रज्ञा आसनिकर, संभाजीराजे पवार, जालिंदर कोतकर, मनोज कोतकर, काजळे सर, शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी आदींसह शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप भोर यांनी केले. सुनिल जाधव यांनी मुलांना अभ्यासासोबत खेळाचे महत्त्व विशद केले. तर कोणताही खेळ हा स्पर्धेपुरता न खेळता पुढे त्याचा सराव सातत्याने चालू ठेवण्याचे आवाहन केले.
संजय धोपावकर यांनी मुलांना खेळात करिअर करायचे असेल तर पालकांशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे. एकतरी आवडीचा मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी सांगितले. अविनाश साठे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करुन जीवनात खेळाचे महत्त्व विशद केले.
आर.आर. पवार म्हणाले की, खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. खेळामध्ये जय-पराजय महत्त्वाचा नसून स्पर्धेत उतरणे व आपल्यातील कौशल्य दाखवणे महत्त्वाचे असते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उद्घाटनाप्रसंगी संचलन व अम्ब्रेला ड्रिल सादरीकरण केले. यावेळी कबड्डी, डॉजबॉल, स्लो सायकलिंगचे सामने मैदानावर अतिशय चुरशीने रंगले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन स्मिता खिलारी यांनी आभार मानले.