मोठी बातमी ! रेशन कार्डवर आता साडी वाटप होणार; सरकारचा निर्णय
रेशनकार्डवर अन्नधान्य मिळते, हे सर्वश्रुत आहे. सरकार दरबारी दाखले किंवा कागदपत्रांसाठी रेशनकार्ड महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरतात. ‘आनंदाचा शिधा’ देखील रेशनकार्ड मार्फत वितरित केला गेला. नगरमधील भाजपचे खासदार सुजय विखे यांनी कुटुंबातर्फे साखर-डाळ देखील रेशनकार्डवरच वाटली होती. यानंतर आता रेशन कार्डधारकांना सरकारकडून साडी वाटप होणार आहे.राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडी वाटपाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना वर्षातून एकदा साडी वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळ ही योजना राबवत आहे. या योजनेसाठी राज्य सरकार महामंडळाला साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, साठवणूक, हमालीसाठी खर्च देणार आहे. तर 2023-24 या वर्षाकरिता महामंडळास एका साडीसाठी 355 रुपये दिले आहेत.