नगर शहरातील सर्वेक्षणात एकाच दिवसात सापडले 50 पेक्षा अधिक अनधिकृत होर्डिंग

उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली चार समित्या नियुक्त

शहरात महापालिकेकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणात एकाच दिवसात 50 पेक्षा अधिक होर्डिंग विनापरवाना असल्याचे आढळून आले. त्यामुळे शहरात अनधिकृत व परवानगी असलेल्या होर्डिंगचा ही सर्वे केला जात असून, त्यासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या स्तरावर चार उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली समित्या नियुक्त करण्यात आल्या आहे. येत्या आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले. प्रशासक डॉ. पंकज जावळे व अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी गुरुवारी प्रभाग अधिकारी व उपायुक्त यांची बैठक घेतली. पहिल्याच दिवसाच्या तपासणी 50 पेक्षा जास्त होर्डिंग अनधिकृत आढळून आले. तसेच अठरा होर्डिंगचा परवाना संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता समितीमार्फत सर्व परवानगी असलेल्या 384 व विनापरवाना होर्डिंगचा सर्वे केला जात आहे. होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल व सर्वेक्षण अहवाल आल्यावरच कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच 09 मे 2022 रोजी शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार नऊ मे 2022 नंतर दिलेल्या परवानगी तपासल्या जाणार आहेत. चुकीची परवानगी दिली असेल तर त्या होर्डिंग वर कारवाई करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी यावेळी सांगितले.