मुंबईत आज महासंग्राम, सांगता सभांमुळे राजकीय वातावरण तापले

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराची सांगता शनिवारी होत असताना शुक्रवारी महायुतीची शिवाजी पार्क येथे आणि इंडिया आघाडीचे मुंबईतील बीकेसी मैदानावर सांगता सभा होत आहे. महायुतीच्या सभेला भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तर महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आपचे नेते अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आदी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मुंबईत प्रचार तोफा धडाडणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीची सभा आयोजित केली असल्याने या सभेचे यजमानपद मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे असणार आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा, अशी आग्रही मागणी या सभेत राज ठाकरे यांच्याकडून केली जाणार असल्याची चर्चा आहे. ही अनेक वर्षांची मागणी चालू आहे. इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास मराठीला अभिषेक भाषेचा दर्जा दिला जाण्याचे आश्वासन काँग्रेसने यापूर्वीच दिले आहे त्याच पार्श्वभूमीवर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मोदी यांच्याकडून राज्याला ठोस आश्वासन देऊन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाकडून मोठी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यामध्ये 24 पेक्षा अधिक सभा झाल्या असून शुक्रवारची सभा ही लोकसभा निवडणुकीसाठीची त्यांची मुंबईतील शेवटची सभा असेल. मोदी यांचा बुधवारी घाटकोपर येथे रोड शो पार पडला. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर त्याच मतदारसंघात रोड शो झाल्याने विरोधकांनी मोदींवर टीका केली होती. या टीकेला मोदी या सभेतून उत्तर देण्याची शक्यता आहे.