परदेशी नागरिकांना मोफत शिकता येणार हिंदी

भारतीय दूतावासाचा अनोखा उपक्रम

नवी दिल्ली:

हिंदीभाषेचा प्रसार करण्यासाठी भारतीय दुतावासाकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.  हिंदी भाषा शिकण्यासाठी तसेच भारताच्या संस्कृतीबाबत जाणून घेण्यासाठी परदेशी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.  या अशाच उत्सुक आणि हिंदीबद्दल जाणून घेण्यासाठी जिज्ञासू परदेशी नागरिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अमेरिकी आणि परदेशी नागरिकांसाठी हा  कोर्स असणार आहे. विशेष म्हणजे हा कोर्स विनाशुल्क शिकवण्यात येणार आहे.

 
या कोर्सची सुरुवात नववर्षापासून होणार आहे.  16 जानेवारी 2020 पासून या कोर्सला सुरुवात होणार आहे.  भारतीय दुतावासात हा कोर्स शिकवण्यात येणार आहे.  संस्कृतीचे शिक्षक मोक्षराज हे हिंदी शिकवणार आहेत.  याबाबतची माहिती दुतावासाने एका निवेदनात दिली आहे.   आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारताबद्दल योग्य आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी ही लोकं हिंदी शिकण्यासाठी इच्छूक असल्याची प्रतिक्रिया मोक्षराज यांनी दिली.
 
मोक्षराज हे वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासामध्ये नियुक्त केलेले पहिले सांस्कृतिक प्रतिनिधी आहेत.  भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने त्यांची येथे भारतीय संस्कृती शिक्षक म्हणून नेमणूक केली आहे.