आयपीएलच्या १३ व्या हंगामाची आज शेवटची लढत 

मेगा फायनलमध्ये कोणाची होणार दिवाळी ?

दुबई :
 
गेल्या ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाची आज अखेरची लढत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ही लढत होईल. यात विद्यमान विजेते मुंबई इंडियन्सकडे पाचव्यांदा तर दिल्ली कॅपिटल्सकडे पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी असणार आहे.

 

देशातील करोना परिस्थितीमुळे एक वेळ अशी आली होती की, आयपीएलचा १३वा हंगाम रद्द करावा लागेल की काय असे वाटू लागले होते. पण त्यानंतर युएईमध्ये स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले. आता आज अखेरची लढत देखील चुरशीची होण्याची आशा आहे.

अंतिम लढतीत आलेल्या दोन्ही संघांनी स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. गुणतक्त्यात देखील हे संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. या दोन्ही संघांकडे जगातील अव्वल क्रमांकाचे जलद गोलंदाज आहेत. 
 
दिल्लीकडे कागिसो रबाडा आणि एनरिच नोर्जे तर मुंबईकडे जरप्रित बुमराह आणि ट्रेंट बोल्ट अशी अव्वल गोलंदाजांची फळी आहे. या चारही गोलंदाजांनी आयपीएलचा १३वा हंगाम गाजवला आहे. रबाडाने २९, बुमराहने २७, बोल्टने २२ तर नोर्जेने २० विकेट घेतल्या आहेत. 
 
अंतिम सामन्यात पुन्हा एकदा या दोन्ही संघातील गोलंदाजांमध्ये टक्कर होईल आणि ज्या संघातील जलद गोलंदाज यशस्वी होतील विजय मात्र त्यांचाच होणार आहे.