नागपूर :
धारदार शस्त्रांनी गळा चिरून मंगलकार्यालय संचालकाचा नागपूरमध्ये खून करण्यात आलाय . ही थरारक घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोपालनगरमधील तिसरा बसस्टॉप परिसरात घडली. अनिल पालकर असे मृताचे नाव आहे.
अनिल यांचे हिंगणा येथे मंगल कार्यालय आहे. सोमवारी रात्री ते गोपालनगर भागात उभे होते. दोन ते तीन मारेकरी त्यांच्याजवळ आलेत. धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात अनिल खाली पडले. त्यांचा मृत्यू झाला. मारेकरी पसार झालेत.
घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. जुन्या वैमनस्यातून अनिल यांची हत्या केल्याची चर्चा आहे.
दुसरी घटना वेळाहरी भागात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दगडाने ठेचून २४ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. विनीत बनसोड असे मृताचे नाव आहे. तो मिहानमध्ये काम करायचा. शनिवारी तो मिहानमध्ये आला. दुपारी तो नातेवाइकांशी बोलला. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. सोमवारी दुपारी वेळाहरी भागात एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती हिंगणा पोलिसांना मिळाली.
पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मृतदेहापासून २० फुट अंतरावर मोटरसायकल होती. मोटरसायकलच्या क्रमांकावरून मृतकाची ओळख पटली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.