कोरोनामुळे 15 मार्चपर्यंत जमावबंदी, अत्यावश्यक सेवा वगळता रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत व्यक्तींना फिरण्यास मनाई

:नगर ः कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहे. त्याच पार्श्‍वभूमीर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज रात्री उशिरा आदेश काढत 15 मार्चपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला. या आदेशानुसार वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. अंमलबजावणीसाठी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत व्यक्तींना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व आदेश लागू राहतील. विवाह समारंभ, इतर समारंभासाठी मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल, समारंभा ठिकाणी 50 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींना परवानगी असणार आहे. समारंभ, सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडा स्पर्धा, सण-उत्सव, उरूस, जत्रा या कार्यक्रमांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून 50 व्यक्तींना उपस्थितीत राहता येईल. अहमदनगर जिल्ह्यातील हॉटेल, फुड कोर्टस्, रेस्टॉरंट, बार ही ठिकाणे देखील 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. नो-मास्क, नो-एन्ट्री हा तत्वाचा अवलंब करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. मोठी सार्वजनिक संमेलने, सभा, विविध संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा या 50 व्यक्तींच्या उपस्थित घेण्यात येतील. शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकाने ही सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेपर्यंत खुली राहतील, असे आदेशात म्हटले आहे.