लाडक्या बहिणीसाठी एडीसीत झिरो बॅलन्सवर खाते : कर्डिले

अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिला भगिनींना दीड हजार रुपये महिना अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे. या अंतर्गत योजनेमधील महिलांकरिता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शून्य रुपयात बँक खाते उघडून देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला भगिनींकडून शासनाने एक जुलै 2024 पासून फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बँकेचे खाते असणे आवश्यक असल्याने बँक खात्याअभावी महिलांचे नुकसान होऊ नये, खाते उघडताना आर्थिक भर दंड पडू नये यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हा निर्णय घेण्यात घेतला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष कर्डिले, उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिली. महिलांना आपल्या जवळच्या जिल्हा बँक शाखेत झिरो बॅलन्स खाती बँकेच्या सर्व शाखांमध्ये तत्काळ खाते उघडून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिलांनी खाते उघडण्याचे फॉर्म, दोन फोटो, आधार कार्ड झेरॉक्स आवश्यक कागदपत्रांची केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्डिले यांनी केले आहे.