श्रीरामपूर येथील बाजार समिती : रात्रीचे लिलाव रद्द
बाजार समितीत आता पहाटेच्या वेळी भाजीपाला लिलाव होणार
श्रीरामपूर : येथील बाजार समितीत भाजीपाल्याचा लिलाव आता पहाटे पाच वाजता घेण्याचा निर्णय संचालक मंडळांन घेतला. यापूर्वी रात्री दोन ते अडीच वाजता हे लिलाव पार पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी माल वाहतूक करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. सभापती सुधीर नवले, सचिव साहेबराव वाबळे, संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, मनोज हिवराळे यांनी शुक्रवारी पहाटे भाजपाला बाजाराला भेट दिली. यावेळी व्यापारी, हमाल उपस्थित होते. सर्वांनी एकमताने लिलाव पहाटे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचे सर्व शेतकऱ्यांनी हे स्वागत केले. शुक्रवारपासून पहाटे साडेचार वाजता समितीचे प्रवेशद्वार खुले केले गेले. त्यानंतर वाहने दाखल झाले हमालांनी सर्व वाहनातील माल खाली उतरून घेतला. त्यानंतर पहाटे पाच वाजता लिलाव पार पडले. संचालक मंडळाने सर्व गोष्टींची पाहणी केली. त्यापूर्वी रात्री दोन ते अडीच वाजता लिलाव केले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मध्यरात्री आपला माल विक्रीसाठी आणावा लागत होता. यात चोरीचा, अपघाताचा मोठा धोका होता. शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी, हमाल यांचे आरोग्य त्यामुळे खराब झाले होते. तसेच नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातून येथे भाजीपाल्याची आवक होत असते. येथील व्यापारी तसेच वाहतूकदार यांनाही तारेवरची कसरत करावी लागत होती. मध्यरात्री होणाऱ्या लीलावामुळे पुरेशी झोप मिळत नव्हती. त्यामुळे संचालक मंडळाकडे पहाटेच्या वेळी लिलाव घेण्याबाबत विनंती करण्यात आली. त्याची दखल घेण्यात आली. आणि आता पहाटेच्या वेळी लिलाव होणार आहे. त्यामुळे शेतकरी, हमाल यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.