सर्वांगीण स्वच्छतेसाठी आता कचरा संकलन तीन वेळा
अहमदनगर : महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी सकाळी शहरात फेरफटका मारक स्वच्छता आणि कचरा संकलन यंत्रणेची पाहणी केली. शहरात सर्व ठिकाणी नियमित कचरा संकलन व्हावे यासाठी सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे तीन वेळा कचरा संकलन करण्याच्या सूचना त्यांनी घनकचरा विभागाला दिल्या. तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. साफसफाई कामगार, कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यांवरील चालक आणि स्वच्छता निरीक्षक यांची आयुक्तांनी झाडाझडती घेत, वेळेत कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. नगर शहर हे स्वच्छ सुंदर दिसले पाहिजे. यासाठी आपण यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित करणार असून घंटागाड्यांचे वेळापत्रक यासाठी बदलणार आहोत. असे याप्रसंगी डांगे यांनी सांगितले. त्यांनी सकाळी पाहणीला सुरुवात केली होती. यामध्ये कायनेटिक चौकातील कचरा संकलन केंद्राची पाहणी केली. रस्त्यावरील साफसफाई झाल्यानंतर व्यवसायिक दुकाने उघडतात. त्यानंतर दुकानात झाडलोड करून तो कचरा पुन्हा रस्त्यावर फेकून देतात. याबाबत दुकानदारांना सूचना देण्याचेही त्यांनी सांगितले. वारंवार कचरा टाकला जात असेल तर, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. असा सूचना ही डांगे यांनी यावेळी दिल्या. दरम्यान माळीवाडा जवळील असलेली कचराकुंडी तत्काळ बंद करून तो कचरा घंटागाडी द्वारे उचलण्याची कारवाई त्यांनी पार पडली.