मारकडवाडी गावच्या चावडीवर लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा ठेवला जाणार

पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांचा पुढाकार

लोकशाही वाचविण्यासाठी मसुद्यावर लोकशाही राष्ट्रीय चक्र वाहण्यात येणार -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या पुढाकाराने माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावच्या चावडीवर लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा ठेऊन लोकशाही वाचविण्यासाठी त्याचे पूजन केले जाणार आहे. तर त्या मसुद्यावर तमाम ग्रामस्थांच्या सहभागातून लोकशाही राष्ट्रीय चक्र वाहण्यात येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
लोकशाहीमध्ये देशाची अंतिम सत्ता जनतेच्या हातात असते. भारतात संसदीय लोकशाही राबवली जाते, अशा वेळेस निवडून द्यायच्या व्यक्तीला दिलेले मत नक्की पोहोचले पाहिजे. यासाठी मतदारांच्या मनात काही एक शंका असता कामा नये. त्यामुळे देशातील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच निवडणुका घ्याव्यात आणि ईव्हीएम मशीनवर नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांबाबत देशातील तमाम जनतेला चिंता लागली आहे. ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक घोटाळा करता येतो आणि मतदानाच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येतो का? या संदर्भात नागरिकांमध्ये संशय निर्माण होऊन चर्चा रंगली आहे. लोकशाहीत सर्वश्रेष्ठ मतदानाचा अधिकार असून, मतदारांना याबाबत संशय राहता कामा नये.  बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठीचा खर्च अतिशय जुजबी आहे. जगभरातील अतिप्रगत जर्मन, जपान व इतर देशांमध्ये बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जातात. लोकांच्या मनातील शंका संपविण्यासाठी बॅलेटपेपर शिवाय पर्याय नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
लोकशाही संरक्षण कायद्याद्वारे लोकांच्या विश्‍वासाला पात्र होण्यासाठी देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्या! अशी तरतूद लोकशाही संरक्षण कायद्याच्या मसुद्यात ठेवण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान व त्यांचे मंत्री निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य आपल्या सोयीसाठी नेमणार असेल, तर देशातील जनतेला या बाबींमध्ये संशय निर्माण होणार आहे. देशातील निवडणुका आणि निवडणूक आयोग निपक्षपाती होण्यासाठी लोकशाही संरक्षण कायद्याच्या मसुद्यामध्ये निवडणूक आयोग भारताचे सरन्यायाधीशांच्या सहभागाच्या सल्ल्यातून नेमला जावा, असा आग्रह संघटनेने धरला असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
लोकशाही संरक्षण कायद्यामुळे देशात कोणीही हुकूमशाही आणि हम करोसा कायदा आणू शकणार नाही? देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले, त्याची जाणीव राज्यकर्त्यांना असली पाहिजे. देशांमध्ये मतदार अक्कलमारीला अजिबात थारा असता कामा नये, म्हणून मारकडवाडी भारतातील लोकशाही संरक्षणाचे केंद्र झालेले आहे. या ठिकाणी लोकशाही राष्ट्रीय लोकशाही संरक्षण कायद्याच्या मसुद्यावर सत्याग्रहींची नोंद पीपल्स हेल्पलानाईच्या पुढाकाराने करण्यात येत असल्याचे म्हंटले आहे.