नान्नज दुमाला येथे शनिवारी काळी आई ओलावा संवर्धन योजनेचा होणार प्रारंभ

भाऊसाहेब थोरात जन्म शताब्दीचे औचित्य साधून पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार

नगर (प्रतिनिधी)- दंडकारण्य चळवळीचे प्रणेते ग्रीन मार्शल भाऊसाहेब थोरात यांच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून पीपल्स हेल्पलाइनच्या पुढाकाराने नान्नज दुमाला (ता. संगमनेर) येथून शनिवार 28 डिसेंबर पासून काळी आई ओलावा संवर्धन योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
तळेगाव दिघे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य हरिभाऊ दिघे यांनी आपल्या ज्युनिअर कॉलेजच्या परिसरात शेकडो झाडे जगवली आणि विद्यार्थ्यांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधात जागृती निर्माण केली. प्राचार्य दिघे यांच्या सन्मानार्थ नान्नज दुमाला ग्रामस्थांच्या वतीने व संघटनेच्या पुढाकाराने शनिवारी त्यांना हरित श्रीमंत प्राचार्य असा सन्मान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सन 1972 साली महाराष्ट्रासह देशात मोठा दुष्काळ पडला. त्यानंतर देखील पाण्याचे योग्य नियोजन झाले नसल्याने गेली 50 वर्षे लाखो शेतकरी दारिद्य्राच्या खाईत जाऊन पडले. पीपल्स हेल्पलाइनच्या पुढाकाराने आणि नान्नज दुमाला ग्रामस्थांच्या माध्यमातून काळी आई ओलावा संधारण योजना राबविण्याचा निर्णय करण्यात आला आहे. त्यासाठी विज्ञानाने स्पष्ट केलेल्या रेनगेन बॅटरीचा वापर केला जाणार आहे.
विनायक गुंजाळ यांच्या 35 एकर शेतामध्ये रेनगेन बॅटरीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या शेतामध्ये अनेक ठिकाणी पावसाचे पाणी उताराच्या बाजूला वाहते. त्याला आडवे वीस फूट लांबीचे, तीन फुट रुंदीचे आणि आठ फुट खोलीचे खड्डे खोदून त्यामध्ये दगड, गोटे भरले जाणार आहे आणि वरच्या बाजूला थोडा मुरूम भरला जाणार आहे. पावसाळ्यात उताराच्या बाजूला वाणारे सर्व पाणी या रेनगेन बॅटरीच्या दगड गोट्यांनी भरलेल्या खड्ड्यामध्ये सोडले जाणार आहे. त्यातून बाष्पीभवन 20 टक्के पेक्षा जास्त होणार नाही, कारण ऊन, वारा यातून होणारे बाष्पीभवन पावसाचे पाणी जमिनीच्या खाली गेल्यामुळे थांबले जाणार आहे.  त्यामुळे धनराई सारख्या जिरायत फळबागांना वर्षाचे 365 दिवस ओलावा मिळणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात देखील अशा फळझाडांना वरच्या पाण्याची गरज लागणार नाही. परंतु ठिबक पद्धतीने फळबागांची लागवड यशस्वी होऊ शकणार असल्याचे    स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात 65 ते 70 टक्के जमीन ही फक्त जिरायती आहे. रेनगेन बॅटरीमुळे या सर्व जमिनी हंगामी बागायत होवू शकणार आहेत. रेनगेन बॅटरीच्या माध्यमातून नैसर्गिक रित्या भूमिगत जलसाठे निर्माण होतात त्यातून त्या जमिनीतील फलझाड्यांना वर्षभर ओलावा मिळत असल्याचे म्हंटले आहे.