सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या शहरातील पाच दुकानांवर कारवाई

प्रोफेसर कॉलनी चौकातील पाच आस्थापनांना 25 हजारांचा दंड

नगर : सिंगल युज प्लास्टिक संदर्भात मनपाकडून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी येथे हॉटेल्स व दुकाने अशा पाच आस्थापनांना महापालिकेकडून 25 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. शहरात सध्या केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे. आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार सफाई अपनाओ व बिमारी भगाओ या अभियानाअंतर्गत हरित कचरा उचलणे, प्लास्टिक बंदीची 100% अंमलबजावणी करून प्लास्टिकचा कचरा कमी करणे, यासह आरोग्य विषयक उपाययोजना करण्यात येत आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रोफेसर कॉलनी चौकातील दुकाने, हॉटेलची तपासणी केली. यात प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या रुचिरा स्वीट्स, हॉट चिप्स, आक्कीज बर्गर, कॅफे बॉम्बे ग्रील कॅफे, जाधव वडेवाले या पाच आस्थापनांना प्रत्येकी 5000 रुपये याप्रमाणे 25 हजार रुपये दंड करण्यात आला, तसेच 15 किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्वच्छता निरीक्षक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.