महिलांसाठीचा ‘सखी निवास’ अजूनही प्रतीक्षेवरच!
अहमदनगर: नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित राहता यावे, यासाठी वसतिगृहाच्या धर्तीवर सखी निवास योजना गतवर्षी सुरू करण्यात आली आहे. मात्र, वर्षे उलटूनही जिल्ह्यात एकही सखी निवास योजना सुरू झालेली नाही. त्यामुळे नोकरदार महिला या योजनेपासून वंचित आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. शासकीय कार्यालयांत नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित राहता यावे, यासाठी राज्य शासनाने सखी योजना सुरू केली आहे. ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येते. परंतु, या विभागाकडून ‘सखी निवास’ योजना जिल्ह्यात अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही. पीडित महिलांसाठी सखी सदन योजना राबविण्यात येते. पीडित महिलांना सखी सदनात पाच दिवस मुक्कामी राहता येते. त्यांना कायदेशीर सल्ला, पोलिस मदतही पुरविण्यात येते. नोकरदार महिलांसाठीची योजना मात्र कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे नोकरदार महिलांना भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. ही योजना कार्यान्वित करण्याची मागणी पुढे येत आहे