तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकारकडून 305 कोटींचा आराखडा मंजूर

पं पंढरपूरच्या दर्शन मंडपासाठी 129 कोटी रुपये तर नाशिक जिल्ह्यातील भगूरला सावरकर थीम पार्क साठी 40 कोटी रुपये मंजूर

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आकड्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. यात पंढरपूर इथल्या दर्शन मंडप आणि दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. भगूर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीम पार्क साकारण्यात येणार आहे. यासाठी 40 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपये दिले जातील. अमळनेर इथल्या एकमेव मंगळग्रह देवस्थानच्या 25 कोटी सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशय, मौजे मुनावळे इथल्या जल क्रीडा पर्यटन सुविधांसाठी 47 कोटींच्या अतिरिक्त मागणीसह मान्यता देण्यात आली आहे. दर्यापूर इथल्या संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी, ऋणमोचन येथील 18 कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली.गहिनीनाथ गडाच्या 2.67 कोटींच्या कामाला,मुंबईत 16/11 च्या दहशतवादी हल्ल्यात कसाबला जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम उंबाळे यांच्या सातारा जिल्ह्यातील केंबडे इथल्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी 15 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली असून, नागपूरच्या लक्ष्मीनारायण शिवमंदिर नंदनवनच्या 24.73 कोटी कुत्तेवालाबाबा मंदिर आश्रमशांती नगरसाठी 13.35 कोटी आणि मुरलीधर मंदिर पारडी विकास आराखड्यासाठी 14.39 कोटींच्या तरतुदींना मान्यता देण्यात आली आहे.