जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची शिदोरी आवश्यक. :- आ. संग्राम भैय्या जगताप.

सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी) :- कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची शिदोरी अत्यंत आवश्यक आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. त्यामुळे असे कार्यक्रम समाजाला पोषक ठरतात, असे प्रतिपादन अहमदनगर शहराचे आ. संग्राम भैय्या जगताप यांनी केले.

विश्वकर्मा वंशीय समाज संघटन अहमदनगर शाखेच्या वतीने येथील पटेल मंगल कार्यालयात आयोजित सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थी सन्मान व समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. केडगावच्या विश्वकर्मा मंदिराचे अध्यक्ष संजय खामकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अरुण भालेकर, प्रदेश सचिव भाऊसाहेब राऊत, राज्य प्रवक्ते विलास पवार, पश्चिम विभागीय अध्यक्ष राजकुमार राऊत, उपाध्यक्ष गोपाल राऊत, महिला कार्याध्यक्ष शुभदा धामापूरकर, महिला राज्य प्रवक्त्या अनुष्का बेलोरकर, उद्योजक अशोक राऊत, जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर, व्याख्याते प्राचार्य तानाजी शेटे, एकनाथ खामकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप पुढे म्हणाले, की शाळा, महाविद्यालय व विविध व्यावसायिक शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन परीक्षेत यश संपादन केले तर त्यांचे भवितव्य उज्वल ठरते. त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे समाजातील अनेक चांगले लोक समाजापुढे येतात व समाजाला दिशादर्शक ठरतात.
एकनाथ खामकर सर म्हणाले की, आपल्या समाजाची सद्यस्थिती अत्यंत खालावलेली आहे. त्याला बदलती परिस्थिती जबाबदार आहे. सुतार समाजाचा पारंपारिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आपल्याकडे कुणालाही फारशी शेतीवाडी नाही, मोठे उद्योगधंदे नाहीत अशा परिस्थितीत समाजाला पुढे नेण्यासाठी एकमेव आधार आहे तो शिक्षणाचा. त्यामुळे इथून पुढे विद्यार्थ्यांनी आठवीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्यांचा कल समजावून घेणे ही महत्त्वाचे आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू दिले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी प्राचार्य तानाजी शेटे, रामदास गोल्हार, अरुण भालेकर, विलास पवार, गोपाल राऊत, संजय खामकर, अनुष्का बेलोरकर, शुभदा धामापूरकर, विलास महामुनी, केशव सपकाळ यांचीही भाषणे झाली. डॉ. मोहिनीराज सोनवणे (वैद्यकीय), रामेश्वर सोनवणे (कृषी), संदीप राऊत (उद्योग), ज्ञानेश्वर मोरे (अध्यात्मिक), संतोष मोरे (शैक्षणिक), सुभाष सोनवणे (शैक्षणिक), सविता चौगुले (पोलीस प्रशासन) अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्या सुतार समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा यावेळी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भाऊसाहेब राऊत यांनी प्रास्ताविक केले, आदिनाथ भालेकर व महेश वाघ यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद गडकर यांनी आभार मानले. प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमास अहमदनगर जिल्ह्यातील सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार राऊत, भगवान राऊत, प्रशांत जाधव, गोकुळ गाडेकर, मोहिनीराज सोनवणे, प्रभाकर राऊत, अशोक गोरे, गणेश वाकचौरे, प्रवीण वाघमारे, गणेश शेलार, देवेंद्र दुधाले, गणेश सोनवणे, विवेक मुसळे, दिलीप महामुनी, संतोष शिंदे, रूपाली मुसळे, सुनील यशवंत, रवी मोरे, ज्ञानेश्वर नांगरे, योगेश चन्ने, वैशाली गडकर, आशाताई लोंढे, अश्विनी भालेराव, प्रतीक्षा सुतार, मंगल सरोदे, सुनीता मुसळे, विजया केदारी आदींनी परिश्रम घेतले.