Schools in the state will start after Diwali

11वी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय

मुंबई :

महाराष्ट्र राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.  तर दुसरीकडे 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहे.  त्या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
 राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे.  9वी ते 12वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत विचार केला जाईल, असं गायकवाड यांनी सांगितले आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा पालकांना टप्प्या-टप्प्यात फी भरण्याची मुभाही देण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितले.
तसंच जर विद्यार्थी फी भरु शकला नाही तर शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही.  एखाद्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास, अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.