सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जेव्हा एक खगोलीय पदार्थ दुसऱ्या खगोलीय पदार्थाला आपल्यामागे झाकतो तेव्हा त्याला पिधान असे म्हणतात. ठराविक कालावधीनंतर चंद्र शनी ग्रहाला आपल्यामागे झाकत असतो. ही प्रक्रिया दुर्मिळ नसली तरीही काही ठराविक कालावधीचे अंतर त्यात असते. परंतु, त्या ठराविक कालावधीत शनीचे एकापाठोपाठ एक अशी जवळपास चार ते पाच पिधान होतात. भारतातून गेल्या महिन्यातही अशा प्रकारे शनीचे पिधान दिसले होते. पण ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हे पाहणे शक्य झाले नाही. परंतु आज नागरिकांना शनीचे हे पिधान पाहता येणार आहे.सूर्य ग्रहणाच्यावेळी चंद्र सूर्याला आपल्यामागे झाकतो. त्याचप्रमाणे आज (ता. १४) चंद्र शनी ग्रहाला आपल्या मागे झाकणार आहे. संपूर्ण भारतातून शनीचे हे पिधान सोमवारी रात्री दिसू शकणार आहे. शनी ग्रह चंद्रामागे झाकला जाण्याच्या प्रक्रियेतील स्थिती. शनीचे हे पिधान संपूर्ण भारतातून दिसू शकणार आहे. हे पिधान आपल्याला नुसत्या डोळ्यांनी पण दिसणार आहे. परंतु, तुमच्याकडे एखादी लहान-मोठी दुर्बीण असेल किंवा एखादी द्विनेत्री दुर्बीण असेल तर या पिधानाचे तुम्हाला चांगल्या पद्धतीने निरीक्षण करता येणार आहे. खगोलीय दुर्बीण असेल, तर शनी ग्रहाभोवती असणारी कडी सुद्धा दिसू शकणार आहे. शनीचे हे पिधान पाहण्यासाठी सोमवारी रात्री साडेअकरा वाजल्यापासून निरीक्षणास सुरवात करावी. चंद्राच्या पूर्वेला तुम्हाला शनी सहज ओळखता येईल. शनी आणि चंद्र एकमेकांच्या जवळ येत असल्याचे नागरिक पाहू शकतात. मग चंद्र हळूहळू शनीला आपल्यामागे झाकेल. त्यानंतर तासाभरानंतर शनी ग्रह परत एकदा चंद्राच्या मागून बाहेर येताना दिसेल.