एसटी कडून प्रवासी राजा दिनाचे वेळापत्रक जाहीर
अहमदनगर : प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचे स्थानिक पातळीवर, जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार अहमदनगर विभाग नियंत्रकांनी पुढील महिनाभराचे वेळापत्रक जाहीर केले असून, प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या डेपोत हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानानुसार ठरलेल्या दिवशी एसटीचे जिल्हाप्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन, प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्यास मदत होणार आहे. नगर जिल्ह्यातील वेळापत्रकाप्रमाणे सकाळी दहा ते दोन या वेळेत प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येईल. या वेळेत प्रवासी, संघटना, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी त्यांच्या जर काही समस्या असतील, तर त्या मांडाव्यात. यानंतर दुपारी तीन ते पाच या वेळेत कामगार, पालक दिन साजरा करण्यात येईल. त्यात परिवहन कर्मचारी व संघटना यांच्या समस्या तक्रारींबाबत चर्चा होईल. व त्याचे तत्काळ निराकरण करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांसह सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे.