अहमदनगर जिल्ह्यात बाजरी पेरणीत घट

सोयाबीन, उडीद, तुरीला पसंती

अहमदनगर : यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने जिल्ह्यात खरीप हंगामाच्या 95% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सोयाबीन, उडीद, तुरीला शेतकऱ्यांचे पसंती मिळाली असून बाजरीचा पेरा घटला आहे. दोन वर्षांनंतर यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधीत चांगले पैसे मिळवून देणाऱ्या पिकांची निवड केली. यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांना अधिक पसंती मिळाली आहे. ही पिके निघाल्यानंतर शेतकरी कांदा, गहू, ज्वारी, हरभरा अशी पिके घेऊ शकतात. तसेच या पिकांना प्रति क्विंटल भावही चांगला मिळतो. मागील वर्षी सोयाबीनला मात्र अपेक्षित भाव मिळाला नव्हता. यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिल्याचे दिसून येते. एक लाख 37 हजार 940 हेक्टरवर सोयाबीन पेरणी यंदा झाली आहे. त्याचबरोबर बाजरीच्या पेरातही घट झाली. पारनेर, नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुगला पसंती दिली आहे. पारनेर तालुक्यात 22,112 हेक्टर, नगर तालुक्यात 15,135 हेक्टरवर मूग पेरणी झाली आहे. उडीद पेरणी ही यंदा उद्दिष्ट प्रमाणे झाली आहे. जामखेडमध्ये 2453 हेक्टर, कर्जत तालुक्यात १७,६६२ हेक्टरवर उडीद पेरणी झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील 6,6495 हेक्टरवर उडीद पेरला गेला आहे. याशिवाय पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाला शेवगाव तालुक्याची पहिली पसंती मिळाली आहे. 41450 हेक्टरवर या ठिकाणी कापूस लागवड झाली. याशिवाय नेवाशामध्ये 28 हजार 801 पाथर्डीत, 22,602 राहुरी मध्ये 1496 हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे.