प्रस्थापित राजकारणाला वंचित बहुजन आघाडी पर्याय ठरणार – प्रा. किसन चव्हाण

निवडणुकीत राबणाऱ्या कार्यकर्त्याला संधी न देता पुढाऱ्यांच्या घरातील लोकांनाच उमेदवाऱ्या दिल्या जातात.

ऋषिकेश राऊत

अहमदनगर (प्रतिनिधी) :-

 

गरीब मराठयासह बहुजनांचा इथल्या सर्वच राजकीय पक्षांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वोट बॅंक म्हणून वापर केला. त्यातूनच सत्ता आणि सत्तेतून पैसा हे राजकीय सत्तेचं समीकरण रूढ झाल आहे. त्यातूनच राज्यात घराणेशाही व सरंजामशाही जन्माला आली. परंतु येणाऱ्या काळात या प्रस्थापित घराणेशाही च्या राजकारणाला वंचित बहुजन आघाडी पर्याय ठरणार आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केले

शेवगाव येथील ममता लॉन्स मध्ये पार पडलेल्या तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वंचित चे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे,शेवगाव नगर परिषद निवडणुकी साठी पक्षाचे निरीक्षक डॉ नितीन सोनवणे हे उपस्थित होते.

 

यावेळी बैठकीत बोलताना प्रा चव्हाण म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पाच वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या असतात. या निवडणुकीत एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे पक्ष नेते मात्र स्वतःचे कारखाने,  बॅंका, मार्केट कमिट्या, या कुरण असलेल्या संस्थेच्या निवडणुका मात्र आपआपसात समझोता करून बिनविरोध करतात. स्थानिक निवडणुकीत राबणाऱ्या कार्यकर्त्याला संधी न देता पुढाऱ्यांच्या घरातील लोकांनाच उमेदवाऱ्या दिल्या जातात. मात्र वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असेही चव्हाण म्हणाले.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, निरीक्षक डॉ नितीन सोनवणे, बन्नो भाई शेख, प्यारेलाल शेख, रवींद्र बोरुडे, शाहूराव खंडागळे, सुनीता जाधव यांनाही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी तालुक्याच्या वतीने प्रा. किसन चव्हाण यांच्या ‘आंदकोळ’ या आत्मकथनाचा सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बी. ए. च्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेश खंडागळे, गोरख वाघमारे, सागर गरुड, विठ्ठल मगर, कैलास चोरमाले, विष्णू वाघमारे, अशोक लोढे पाटील, धोंडीराम मासाळ, मुकेश मानकर, लक्ष्मण मोरे, सचिन खंडागळे, दीपक साळवे, सागर हवाले, रमेश खरात, संजय कुऱ्हाडे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तरुणाची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. भारत मिसाळ यांनी आभार मानले.