सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष श्याम शिंदे यांना पी.एच.डी.पदवी प्रदान.

श्याम शिंदे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद ची 'विद्यावाचस्पती' ही पदवी नुकतीच प्रदान.

ऋषिकेश राऊत :- 

अहमदनगर (प्रतिनिधी) 

येथील सप्तरंग थिएटर्स या प्रतिथयश नाट्यसंस्थेचे अध्यक्ष, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्याम शिंदे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद ची ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. ‘लघुपटातून मांडला जाणारा सामाजिक आशय-एक संवादशास्त्रीय अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएच.डी.च्या संशोधनासाठी प्रबंध सादर केला होता.

श्याम शिंदे यांना संशोधनासाठी  डॉ. विशाखा गारखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल न्यू आर्टस कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे, उपप्राचार्य डॉ.सागडे व डॉ.पंधरकर , डॉ. बापू चंदनशिवे यांनी तसेच अहमदनगरच्या कला क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. अहमदनगर जिल्हयाच्या कला क्षेत्रातील विशेषतः नाट्यक्षेत्रातील व्यक्तीने मिळविलेली बहुधा ही पहिलीच पी.एच.डी.आहे.

श्याम शिंदे यांनी सन १९८८ मध्ये येथील न्यु आर्ट्स, अँड सायन्स कॉलेजमधून बीएस्सी.ची पदवी घेतली. त्यांनतर कुठेही नोकरी न करता त्यांनी ‘सप्तरंग ‘ या नावाने फोटो व व्हिडीओ शूटिंग हा व्यवसाय निवडला. आणि या व्यवसायात त्यांनी नगर जिल्ह्यात आपला वेगळा ठसा उमटवला. त्या नंतर सुमारे २५ वर्षांच्या शैक्षणीक विश्रांतीनंतर ‘ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ‘ या अभ्यासक्रमाचेे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर सी.एस. आर.डी. अहमदनगर येथे काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले.

२८ ऑगस्ट १९८६ रोजी त्यांनी नगर येथे सप्तरंग थिएटर्स या नाट्य संस्थेची स्थापना केली. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांनी नाट्य लेखन, दिग्दर्शन, अभिनय, एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा, व्हिडीओ चित्रपट, हिंदी राज्य नाट्य स्पर्धा अशी चौफेर कामगिरी केली. सुरुवातीच्या काळात सांस्कृतिक कार्य संचालनालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच एन.सी. पी. ए. मुंबई च्या वतीने आयोजित विविध नाट्य प्रशिक्षण शिबिरातून नाट्य विषयक ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर औरंगाबाद च्या सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयातून नाट्य विषयक पदविका घेतली. १९९२ मध्ये ‘नाट्य दर्पण’ च्या एकांकिका स्पर्धेत त्यांनी लिहलेल्या ‘भोवरा’ या एकांकिकेस प्रथम क्रमांक मिळाला. सन २००२ मध्ये कै. वि. र. बाम, स्मृती एकांकिका स्पर्धेत त्यांनी लिहलेल्या ‘टॅप देम’ या एकांकिकेस प्रथम क्रमांक मिळाला. सप्तरंग थिएटर्स चे अध्यक्ष व नाट्य दिग्दर्शक या नात्याने सलग ३५ वर्षांपासून त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.

त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मन धुव्वाधार, थँक यु मिस्टर ग्लाँड, डॉ. हुद्दार, हातचा एक, अंदमान, तर्पण, याचक व तिर्थरूप चिरंजीव या नाटकांना प्रादेशिक केंद्रावर दिग्दर्शनाची पारितोषिके मिळाली. सन २००४ मध्ये झालेल्या ४३ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘तर्पण’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. २००६ मध्ये झालेल्या ४५ व्या हिंदी राज्यनाट्य स्पर्धेत ‘मृत्यूछाया’ या नाटकासाठी दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्रादेशिक राज्य नाट्य स्पर्धेत झालेल्या ‘डॉ. हुद्दार’ या नाटकासाठी प्रकाश योजनेचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर ‘मृत्यूछाया’ या हिंदी नाटकाकरिता अंतिम फेरीत प्रकाश योजनेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

त्यांनी सप्तरंग थिएटर्स या नाट्य संस्थेच्या माध्यमातून सलग ५ वर्षे राज्य पातळीवरील एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले. गेल्या ३५ वर्षांपासून नवोदित व हौशी नाट्य कलावंतांसाठी दरवर्षी नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. ९० च्या दशकात ‘मृगजळ’ या पहिल्या व्हिडीओ चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली व येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात तो प्रदर्शित करण्यात आला. १९८८ पासून सातत्याने मराठी राज्य नाट्य स्पर्धा, हिंदी राज्य नाट्य स्पर्धा व विविध एकांकिका स्पर्धेत त्यांचा सहभाग असतो. बाकी इतिहास, भवर, अंदमान, तर्पण, मृत्यूछाया या हिंदी नाटकाचे प्रयोग मुंबई नगरीत सादर करून अनेक पारितोषिके मिळविली. राज्य नाट्य स्पर्धेत २५ हुन अधिक नाटके सादर करून १०० हुन अधिक पारितोषिके त्यांच्या संस्थेने मिळविली आहेत. त्यांना दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, ध्वनी संकलन व लेखन क्षेत्रात अनेक पारितोषिके मिळाली आहेत.