अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा मान राखला

जालना | 14 सप्टेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडलं आहे. उपोषणाच्या 17व्या दिवशी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पटील यांच्याशी 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांना ज्यूस पाजला आणि त्यांचं उपोषण सोडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेव. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलं. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही जास्त आढेवेढे न घेता उपोषण मागे घेतलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री म्हणून तोंडभरून कौतुक केलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री गिरीश महाजन, अतूल सावेही होते. तर उपोषण स्थळी मंत्री संदीपान भुमरे आणि माजी आमदार अर्जुन खोतकर आधीच पोहोचले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालच अंतरवाली सराटीत येणार होते. पण काल त्यांचा दौरा अचानक रद्द झाला.
मात्र, रात्री गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी जालन्यात येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शेड्यूलमध्ये नसतानाही मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी जालन्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते सकाळी पावणे अकराच्या सुमारास जालन्यात पोहोचले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांचा पाठीवर हात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आले. आल्यावर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर मुख्य विषयाला हात घालत त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाचही मागण्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. एका एका मागणीवर सविस्तर माहिती दिली. जरांगे पाटील यांनीही त्यांची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली.
मनोज जरांगे यांच्या मागण्या काय?
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. जीआरमधील वंशावळीचा उल्लेख काढून टाकावा. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं. सक्तीच्या रजेवर पाठवणं हा त्यावरचा उपाय नाही. तसेच ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, आदी मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. या मागण्यांवर ते अडून होते. त्यामुळेच त्यांचे उपोषण लांबले.