मराठा समाजाच्या जागेबाबत नगर रचनाकार सभेत खोटे बोलले

अहमदनगर महापालिकेत महासभेत मराठा समाजाला जागा देण्याबाबत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर मनपाच्या नगररचना विभागातील सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी चक्क खोटी माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर चारठाणकर यांचे चांगलेच त्रेधा उडाली. ‘माझी चूक झाली मला माफ करा’ अशा शब्दात त्यांनी मंगळवारी नगरसेवकांच्या बैठकीत माफी मागितली.
मराठा समाजाला सामाजिक उपक्रमासाठी अहमदनगर शहरातील मालेगाव येथील जागा देण्याबाबत तीन वर्षांपूर्वी मनपाच्या महासभेत ठराव संमत झाला होता मात्र ही जागा अद्याप पर्यंत समाजाला मिळालेली नाही. यावर आपण काय कार्यवाही केली. असा प्रश्न नगरसेवक रूपाली वारे यांनी उपस्थित केला यावर उत्तर देताना चारठाणकर यांनी सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला असल्याचे सांगितले. दरम्यान या विषयावर सोमवारी महासभेत चर्चा न झाल्याने याबाबत मंगळवारी आयुक्तांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, नगर सेवक निखिल वारे, नगरसेवक शाम नळकांडे, सागर बोरुडे, अविनाश घुले सेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह दीपक लांडगे, शिवजीत डोके, डॉ. अविनाश मोरे आदी उपस्थित होते. यावेळी वारे यांनी आपण जर मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तर त्याचा जावक क्रमांक द्या अन्यथा मी येथेच पेटवून घेईल, असा पवित्रा घेतला होता. बारस्कर यांनीही शासनाकडे पाठविलेली फाईल दाखवा, अशी मागणी केली. यावेळी गोंधळून गेलेले चारठाणकर म्हणाले, ‘माझी चूक झाली अचानक प्रश्न आला, त्यामुळे मी चुकीचे बोलून गेलो, याबाबत आपली माफी मागतो.’ यावर उपमहापौर भोसले बारस्कर वारे, बोरुडे चांगले संतापले. जर फाईल शासनाकडे पाठविलीच नाही, तर सभागृहाची दिशाभूल का केली? तुम्हाला खोटे बोलायचे आयुक्तांनी सांगितले का? असाम जाब विचारत चारठाणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ही केली सभागृहात खोटे निवेदन करणे चुकीचे आहे. याबाबत नियमानुसार चारठाणकर यांच्यावर कारवाई केली जाईल असे यावेळी आयुक्तांनी सांगितले.