खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन दिव्यांगांच्या योजनांचा फायदा

रिपाईच्या शिष्टमंडळाची जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट

खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन सन २०२० मध्ये पदोन्नती घेणार्‍या शिक्षकांची शारीरिक तपासणी करुन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे.

पदोन्नती घेतलेले काही व्यक्ती हे शारीरिक दृष्ट्या सक्षम असूनदेखील , त्यांनी दिव्यांगांच्या योजनांचा फायदा घेतलेला आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील चौकशी होत नसल्याने, जाणून-बुजून हे प्रकरण दडपण्याचे काम प्रशासनाच्या वतीने केले जात असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.

या प्रकरणात खर्‍या दिव्यांगांवर अन्याय झाला असून, शारीरिक दृष्ट्या सक्षम व्यक्तींनी पदोन्नतीचा लाभ घेऊन  शासनाची मोठी फसवणूक केली आहे. तर यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे.  सन २०२० मधील सर्वच अपंगांची शारीरिक तपासणी करुन, यामध्ये अपंग नसताना खोटे दाखले घेऊन लाभ घेणार्‍या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा १४ मार्च पासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या मागणीसाठी रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन स्मरणपत्र दिले. यावेळी रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, आदिल शेख, संदीप वाघचौरे, प्रकाश भिंगारदिवे आदी उपस्थित होते.