जेऊरच्या बायजमाता यात्रोत्स्वाची जय्यत तयारी
अहमदनगर:
नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येथील बायजामातेचा यात्रा उत्सव राज्यात प्रसिद्ध असून यात्रोत्स्वादरम्यान संपूर्ण राज्यातून भक्त भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
बायजामातेचा यात्रोत्सव बुद्ध पौर्णिमेला असतो. शुक्रवार दि. 5 मे ते रविवार 7 मे या तीन दिवसात यात्रोत्सव पार पडणार आहे. यात्रोत्सव दरम्यान विविध धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात्रोत्सवानिमित्त गावातील मुख्य वेस, महामार्गावरील कमान यांची रंगरंगोटी करण्यात आलेले आहे. तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि. 5 रोजी सकाळी देवीला गंगेच्या पाण्याचा जलाभिषेक, नंतर कावड मिरवणूक संध्याकाळी पालखी मिरवणूक, शोभेची दारू आणि लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे . शनिवारी सकाळी कलावंतांच्या हजेर्यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच वांगे भाकरीचा महाप्रसाद आणि कुस्त्यांचा हंगामा आयोजित करण्यात आलेला आहे .
बायजामाता यात्रा उत्सवातील वांगे भाकरीचा महाप्रसाद राज्यात प्रसिद्ध आहे. तसेच दोन दिवस कुस्त्यांचा हंगामा हे येथील यात्रेचे वैशिष्ट्य आहे . रविवारी देखील वांगे भाकरीचा महाप्रसाद आणि कुस्त्यांचा हंगामा भरणार आहे. जेऊर ग्रामस्थ तसेच यात्रा उत्सव समितीच्या वतीने यात्रोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
यात्रोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जेऊर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.