ज्येष्ठ नागरिकांच्या उपोषणाबाबत हलगर्जीपणा
गुलमोहर रस्त्याच्या निकृष्ट झालेल्या कामा संदर्भात ज्येष्ठ नागरिकांनी सोमवारी (दि.२० फेब्रुवारी) महापालिकेच्या विरोधात उपोषण सुरु केले. ज्येष्ठ नागरिकांच्या उपोषणास राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी मध्यरात्री भेट देऊन उपोषणात सहभाग नोंदवला.
ज्येष्ठ नागरिकांच्या उपोषण स्थळी कोणताही वैद्यकीय कर्मचारी अथवा पोलीस बंदोबस्त आढळला नसून, या उपोषणाचे गांभीर्य देखील मनपा प्रशासनाला राहिले नसल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. तर उपोषणकर्त्यांना वार्यावर सोडणार्या मनपा अधिकारी व प्रशासनाचा निषेध त्यांनी नोंदविला.
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री उपोषणकर्त्यांना प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला सामोरे जावे लागल्याचे चित्र समोर आले. संध्याकाळी साडेसहा वाजता एका ज्येष्ठ नागरिकास चक्कर येऊन पडले, त्यानंतर प्रशासनाने रात्री साडेदहा वाजता सरकारी रुग्णालयातून कर्मचारी पाठवून उपोषणकर्त्यांची तपासणी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या बेफिक्रीचा उपोषणकर्त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला. तर हे आंदोलन अधिक तीव्र करुन जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याची ठाम भूमिका ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.