शिक्षकांचे ‘पंचायत समिती कार्यालया’ समोर जोरदार निदर्शने
जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या दुसर्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने मोटार सायकल रॅली काढून शाळा बंदचे आवाहन करुण , पंचायत समिती कार्यालया समोर चालढकल करणार्या सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला. जमलेल्या आंदोलकांनी सरकारच्या नावाने बोंबाबोंब मारुन जोरदार निदर्शने केली.
या आंदोलनात समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरमुडे, राज्य कार्याध्यक्ष अन्सार शेख, सुधीर काळे, दत्ता पाटील कुलट, राजेंद्र निमसे, शेखर उंडे, बाळासाहेब पिंपळे, गोवर्धन पांडुळे, राजेंद्र ठोकळ, आबासाहेब लोंढे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे, प्रशांत नन्नवरे आदींसह शिक्षक व महिला शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शहरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण करीत मोटारसायकल रॅलीचे रेल्वे स्थानक जवळील अहमदनगर पंचायत समितीच्या कार्यालयात समारोप झाला.