सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे, त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी दुपारनंतर सूनवाणी होणार आहे.
सत्तासंघर्ष याचिकेमध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, पक्षांतर बंदी कायदा, नबाम रेबिया प्रकरण या मुद्द्यांवर दोन्ही गटांकडून पुन्हा युक्तिवाद करण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सोमवारी (ता. २०) ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मंगळवारी न्यायमूर्तींसमोर आल्यानंतर याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अन्यथा शिवसेनेचे बँक अकाऊंट, पक्षनिधी सर्व जाईल, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील अॅड. कपिल सिब्बल यांनी केला.
यावर तुम्ही आधी उच्च न्यायालयात जाऊ शकता, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. शिंदे गटाच्या वकिलांनीही तशी मागणी केली. मात्र, नंतर या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली.
बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होईल. आधी सत्तासंघर्षाची सुनावणी घेऊ. त्यानंतर उद्या निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेऊ. निवडणूक आयोगाविरोधात तुमचे काय म्हणणे आहे, हे प्रथम आम्ही घेऊ. त्यानंतर मेरिटनुसार निर्णय घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रथमच असा पेचप्रसंग असल्याने हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याची आग्रही मागणी ठाकरे गटाने केली होती. यावर अधिक युक्तिवादाची गरज घटनापीठाने व्यक्त केली होती. आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर घटनापीठ काय निर्णय देणार, हे सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.