आषाढीसाठी जिल्ह्यातून सव्वा दोनशे बस
एकादशीनिमित्त राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भावी प्रवाशांनी एकत्र मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाता येणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा. आणि आषाढीसाठी बसमधून विविध योजनांच्या सवलतितून प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. दरम्यान यंदाच्या पंढरपूर यात्रेसाठी एसटीच्या अहमदनगर विभागाने 225 बसची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय वारीसाठी अनेक प्रवासी स्वतःची खाजगी वाहने, रेल्वे, एसटी अथवा विविध दिंडीसोबत चालत पंढरपूर गाठतात. आता भाविकांना थेट स्वतःच्या गावातून पंढरपूर पर्यंत बससेवा उपलब्ध केली गेली आहे. त्याबरोबरच 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांना 50 टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यामध्ये लागू असणार आहे. या योजनेसाठी राज्य परिवहन विभागाकडून एसटी बस उपलब्ध करून देण्यात देण्यात आल्या आहे. त्यापैकी अहमदनगर विभागाला 225 बस मिळाल्या असून, प्रत्येक आगारातून 20 ते 25 बस सोडण्यात येणार आहे. यंदा 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त पंढरपूरला भाविकांची गर्दी पाहायला मिळते. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी दरवर्षी एसटीतर्फे जादा बस सोडल्या जातात. नगर जिल्ह्यातून 8 ते 18 जुलै या काळात पंढरपूरसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.