संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे
दोन वर्षांपासून शिक्षक मिळेना रेनवडी ग्रामस्थ संतप्त
पारनेर तालुक्यातील रेणवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन वर्षांपासून दोन शिक्षकांच्या जागा रिक्त आहे. इतकेच नव्हे तर, पालकांनी अनेक वेळा शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक नेमला गेला नाही. मुलांचे हित विचारात घेऊन पालक व ग्रामस्थांनी स्वखर्चातून खाजगी शिक्षकाची नेमणूकही केली. मात्र यंदाही शिक्षक न दिल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारास टाळी ठोकले. रेनवडी येथे पहिली ते सातवी अखेर शाळा आहे. या शाळेत विद्यार्थी संख्या ही पुरेशी आहे. मात्र पाचवी ते सातवीच्या मुलांना पदवीधर शिक्षक नाही. तीच अवस्था पहिली ते चौथी अखेरच्या मुलांचीही आहे.ग्रामस्थ व पालकांनी वेळोवेळी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे शिक्षकांची मागणी केली होती. मात्र दोन वर्षापासून या शाळेला शिक्षक मिळाला नाही. त्यामुळे शेवटी संतप्त पालकांनी सोमवारी शाळेला टाळे ठोकले. पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेली ही रेणवडीची शाळा आहे. जवळच पुणे जिल्ह्यातील अत्याधुनिक संगणकीकृत शाळा आहे. मात्र तरीसुद्धा येथे विद्यार्थी टिकून आहेत.