राज्यातील ११ हजार कोटींच्या रस्ते कामासाठी १९ निविदा !

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांतील उर्वरित बांधकामासाठी एकूण सहा टप्यांत निविदा मागविल्या होत्या. नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई – नागपूर समृध्दी महामार्ग विस्तारीकरणातील, नागपूर – गोंदिया आणि भंडारा – गडचिरोली महामार्ग प्रकल्पातील एकूण तीन टप्प्यांसाठी ११ निविदा सादर झाल्या आहेत. तर पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पातील शेवटच्या तीन टप्यांतील कामांसाठी एकूण ८ निविदा सादर झाल्या आहेत. पुणे वर्तुळाकार, नागपूर गोंदिया आणि भंडारा – गडचिरोली प्रकल्पातील काही टप्यांतील कामासाठी मार्चमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या नऊ टप्यासह भंडारा – गडचिरोली आणि नागपूर-गोंदिया द्रुतगती मार्गातील काही टप्यातील कामासाठीच्या निविदा निश्चित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.