शेती व पशुसंवर्धन व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिल्यास शेतकर्‍यांचा विकास निश्‍चित -डॉ. मुकुंद राजळे

पारंपारिक शेती व पशुसंवर्धन व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिल्यास शेतकर्‍यांचा विकास निश्‍चित आहे. शेतकर्‍यांनी कालानुरुप बदल करुन नवीन तंत्रज्ञानाचा स्विकार करावा. या आधुनिक पशुसंवर्धनासाठी शासनाने विविध योजना आणल्या असून, किसानकार्ड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुकुंद राजळे यांनी केले.
नगर तालुक्यातील शेंडी येथे शिवरूद्र बहुउद्देशिय प्रतिष्ठान व शेंडी ग्रामस्थांच्या वतीने डॉ. राजळे यांची जिल्हा परिषदच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी पशुपालकांना शासनाच्या विविध योजनेविषयी माहिती देताना डॉ. राजळे बोलत होते. यावेळी शिवरुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा  पोखर्डीचे ग्रामपंचायत सदस्य डॉ. भगवान चौरे, शेंडीचे सरपंच सिताराम (बापू) दाणी, संतोष दाणी, अनिल दाणी, कुंडलिक भगत, साहेबराव दाणी, विठ्ठल दाणी, गंगाराम दाणी, सागर दाणी, गोरख चव्हाण, मारुती आप्पा दाणी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. राजळे यांनी प्रत्येक किसानकार्ड धारकाला 1 लाख 60 हजार रुपये खेळते कर्ज म्हणून वापरण्यास मिळते. हे कर्ज पशुपालकांना अवघे 7 टक्के दराने उपलब्ध होते. सदर कर्ज शेतकर्‍यांना खाद्य, औषधे, कुट्टी यंत्र, तसेच दूध काढण्याचे मशीन इत्यादीसाठी वापरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आभार सरपंच दाणी यांनी मानले. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे शेतकर्‍यांना नेहमीच सहकार्य लाभत आहे. पशुसंवर्धनाचे व्यवसाय करणार्‍या पशुपालकांसाठी किसानकार्ड सुविधा उपलब्ध केली असून, या योजनेतंर्गत दुग्ध व्यवसाय, कुक्कट पालन, शेळी पालन, मेंढी पालन या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. किसानकार्डसाठी जवळच्या पशुवैद्यकिय दवाखाना किंवा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. -डॉ. भगवान चौरे (अध्यक्ष, शिवरूद्र बहुउद्देशिय प्रतिष्ठान)