करार नसलेल्या हॉटेल्सवर थांबतात बसेस : प्रवाशांवर अन्याय
राज्य परिवहन महामंडळाच्या, वाहक आणि चालकांकडून होणारी मनमानी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा करार नसलेल्या काही तालुक्यातील हॉटेलवर बस थांबतात. हा प्रकार सध्या सर्रासपणे पाहायला मिळतो. वाहक आणि चालक हे स्वतःच्या मर्जीनुसार त्यांना पाहिजे त्या हॉटेल्सवर अनधिकृतपणे बसेस थांबवतात. त्यामुळे अशा हॉटेल हॉटेलकडून प्रवाशांची नियमितपणे लूट होते. त्याचबरोबर प्रवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. खरे तर परिवहन महामंडळाचा करार झालेल्या अधिकृत हॉटेल्स चालकांकडून डिपॉझिट घेतले जाते. त्यांना अनेक अटी, शर्तींचे पालन करावे लागते. ठरवून दिलेल्या किमतीमध्येच खाद्यपदार्थ, पाण्याची बॉटल विकावी लागते. तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृह आणि या स्वच्छतेबरोबरच विविध अटी शर्ती ठेवलेले आहेत. असे असताना राज्य परिवहन महामंडळाचा कोणीही अधिकारी येतो, आणि दादागिरी करून फुकट जेवण करून जातात. असाही आरोप काही हॉटेल चालकांनी केलेला आहे. त्यामुळे करार नसलेल्या हॉटेल्सवर थांबणाऱ्या बसेस आणि राज्य परिवहन मंडळाचे वाहक आणि चालकांकडून होणारी मनमानी तसेच प्रवाशांचे आरोग्य आणि त्यांच्यावर होणारा अन्याय या बाजूंचा विचार प्रशासनाने करणे आता नितांत गरजेचे आहे.