हिंदुस्थानचे ऑलिम्पिकमधील कुस्तीतील सहावे पदक, कुस्तीपटू रवी दहियाला रौप्य पदक

रशियन ऑलिम्पिक समितीच्या झवूर युग्वेव याच्याकडून पराभव

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

हिंदुस्थानी कुस्तीपटूंकडे गुरुवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची सुवर्णसंधी होती. पण रवी दहिया वगळता एकाही कुस्तीपटूला हिंदुस्थानसाठी पदक जिंकता आले नाही. रवी दहियाला 57 किलो वजनी गटात रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. रशियन ऑलिम्पिक समितीच्या झवूर युग्वेव याच्याकडून रवी दहियाला अंतिम फेरीत 7-4 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सुवर्ण पदकापासून त्याला दूरच रहावे लागले. टोकियो ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचे हे पाचवे पदक ठरले. तसेच ऑलिम्पिकच्या इतिहासातील कुस्तीमधील हे हिंदुस्थानचे सहावे पदक ठरले. विनेश फोगट, अंशू मलिक व दीपक पुनिया या तीन कुस्तीपटूंकडून मात्र निराशाच झाली.

 

 

नंबर वन कुस्तीपटूची शरणागती

कुस्तीमधील 53 किलो वजनी गटातील जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाची खेळाडू विनेश फोगट हिच्याकडून गुरुवारी सपशेल निराशा झाली. बेलारूसच्या वॅनिसा कलाझिनस्काया हिच्याकडून तिला 9-3 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. तसेच वॅनिसा कलाझिनस्काया हिला अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे विनेश फोगटला रेपेचेजद्वारे कास्य पदक जिंकण्याची संधीही मिळाली नाही. दरम्यान, याआधी विनेश फोगट हिने सुरुवातीच्या फेरीत सोफिया मॅटसन हिला 7-1 अशा फरकाने पराभूत करीत शानदार सुरुवात केली होती. पण तिला आपला फॉर्म कायम राखता आला नाही.

बजरंग, सीमाकडून अपेक्षा

या खेळात हिंदुस्थानच्या सात खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले होते. आता उद्या हिंदुस्थानच्या दोन कुस्तीपटूंच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. पुरुषांच्या गटात बजरंग पुनिया 65 किलो वजनी गटात पदक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील. तसेच महिला गटात सीमा बिस्ला 50 किलो वजनी गटात सर्वस्व पणाला लावेल.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

सुवर्ण पदकाचे स्वप्न भंग

ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या एकाही कुस्तीपटूला सुवर्ण पदक पटकावता आलेले नाही. रवी दहियाकडून गुरुवारी ही अपेक्षा बाळगली जात होती. पण रशियन ऑलिम्पिक समितीच्या झवूर युग्वेव याने पहिल्या पिरियडमध्ये चार गुणांची कमाई करीत रवी दहियावर दोन गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱया पिरियडमध्ये झवूर युग्वेव याने तीन गुणांची कमाई केली. रवी दहियाला या पिरियडमध्येही दोनच गुण संपादन करता आले. त्यामुळे 7-4 अशा फरकाने रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. याआधी हिंदुस्थानसाठी खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त व साक्षी मलिक या कुस्तीपटूंनी ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा रवी दहिया हा हिंदुस्थानचा पाचवा कुस्तीपटू ठरला आहे.