केडगावच्या जेएसएस स्कूलला तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश

मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कारवाई करण्याचा दिला इशारा

महापालिका शिक्षण विभागाने काढले पत्र

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष व सचिवांना काढले आहे. तर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी यांनी पत्राद्वारे दिला आहे.
रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहर कांबळे यांनी केडगाव येथील बालाजी कॉलनी, अंबिका नगर येथे जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला पूर्व प्राथमिक मान्यता असताना विनापरवानगी प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग भरवले जात असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची महापालिका शिक्षण विभागाने दखल घेऊन सदर आदेश काढले आहे.
रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने कांबळे यांनी जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला पूर्व प्राथमिकची परवानगी असताना बेकायदेशीरपणे माध्यमिकचे वर्ग राहत्या ठिकाणी भरवीले जात आहे. शाळेच्या आवारातील पुरुष कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतलेले नाही, शाळेत तक्रारपेटी उपलब्ध नाही, शाळेत सखीसावित्री समिती फलक नाही, शैक्षणिक पात्रता धारक शिक्षक वर्ग नाहीत, शाळेत मुलांसाठी खेळाचे मैदान नाही, मुलांसाठी आवश्‍यक भौतिक सुविधा नसल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली होती.
शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी यांनी काढलेल्या पत्रात शाळेस शासनाची परवानगी नसताना, सदर ठिकाणी अनाधिकृतपणे माध्यमिकचे वर्ग भरवीत असल्यास तात्काळ बंद करावेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन नजीकच्या शाळेत समायोजन करावे, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानाची सर्व जबाबदारी शाळेवर राहणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे. या प्रकरणी तात्काळ योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करण्याचे प्रशासनाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.