पंढरपूर:
आरक्षणाच्या मुद्यांवरून मराठा क्रांती मोर्चानं 7 नोव्हेंबरला पंढरपुरातून आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
6 नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. संचारबंदी काळात पंढरपूर शहरात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहराकडे जाणाऱ्या सर्व बसेस बंद राहणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आक्रोश आंदोलनात गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
मराठा क्रांती मोर्चाकडून पंढरपूर ते मंत्रालय असा पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफळा ते पश्चिम द्वार परिसर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग, अशा अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.