मोकाट जनावरांच्या त्रासामुळे नगर शहरातील नागरिक हैराण

मनपाचे दुर्लक्ष : कधी वाहतुकीला अडथळा तर कधी नागरिकांवर हल्ला

अहमदनगर महापालिकेची मोकाट जनावरे पकडणारी यंत्रणा गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ठप्प असल्याने, शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव चांगलाच वाढला आहे. रस्ते, चौक, उद्याने, मोकळी मैदान यासह रहिवासी परिसरातही या जनावरांचा वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कधी वाहतुकीला अडथळा तर कधी ही जनावरे थेट नागरिकांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे मनपाने जनावरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मनपाच्या कोंडवाडा विभागामार्फत मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवले जाते.जनावरे रस्त्यावर फिरताना आढळून आली, तर ती पकडून कोंडवाड्यात बंद केली जातात. मनपा खाजगी ठेकेदारांच्या माध्यमातून हे काम करून घेते. शहरात मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून जनावरे पकडणारी यंत्रणा ठप्प आहे. हे काम करणाऱ्या संस्थेचा ठेका संपल्यानंतर मनपाने तातडीने निविदा प्रक्रिया राबवून हे काम मार्गी लावणे गरजेचे होते. मात्र अद्यापपर्यंत या कामाची निविदास काढण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना मोकाट कुत्र्यांसह, मोकाट जनावरांचाही सामना करावा लागत आहे.