नगर – छत्रपती संभाजीनगर मार्गवर भीषण अपघात, ट्रक चा ब्रेक फेल झाल्याने ७ वाहनांचा चुराडा तर १५ जण जखमी

जखमींवर नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू

अहमदनगर – अहमदनगर वरुन छत्रपती संभाजीनगर कडे जाणारा ट्रक पांढरी पुलाच्या उतारावर सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास अनियंत्रित ट्रकने कार, दुचाकी, मालवाहू वाहन अशा ७ वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात विविध वाहनांतील १५ जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, पुलाजवळील चौकातून १०० ते १५० मीटर पर्यंत वाहनांना ट्रक उडवले, त्यानंतर साधारण १.५ किलोमीटर अंतरावर जाऊन अपघाती ट्रक थांबला. या अपघातात छत्रपती संभाजीनगरच्या दोन कारसह पिंपरी चिंचवड, सातारा, नगर, श्रीरामपूर येथील कारचा समावेश आहे. घाटाच्या उतारावर ट्रक चा ब्रेक फेल झाल्याने तो अनियंत्रित झाला होता. या अपघातातील 11 जखमींना नगरमधील शासकीय व खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पूल संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगर कडे जाताना अपघात प्रवण क्षेत्र आहे. या भागातच उतारावर सातत्याने अपघात घडत असतात. सोमवारी सायंकाळी हा ट्रक वेगात खाली उतरत होता. सुरुवातीला कोणालाही याचा अंदाज आला नाही, परंतु भरधाव ट्रक (एमएच १६ सीसी ४३४३) हा अनियंत्रित झाला व पुलाच्या खाली असलेल्या चौकातून जाणाऱ्या मारुती इको (एम एच १४ जेई ३४०१), मालवाहू छोटे वाहन (एमएच ११ सीएच १७०४), मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच 17 बीएक्स ५१६१), वॉक्सवेगन (एमएच २० जीके १९९८), छत्रपती संभाजीनगरची पासिंग असलेली एक टाटा टिगोर, दुचाकी (एमएच १६ ४२१९), तसेच ईर्टीगा कार अशा ७ वाहनांना ट्रकने उडवले व तो ट्रक दीड किलोमीटर अंतरावर जाऊन थांबला. ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला आहे. पांढरी पुल परिसरातील ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत करून रुग्णवाहिकांना प्राचारण केले. अपघातग्रस्त वाहनातून 11 जखमींना तात्काळ नगरच्या शासकीय व इतर ४ जणांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर सुमारे दीड ते दोन तास वाहतूक भीम्या गतीने सुरू होती या घटनेची माहिती मिळताच सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, वाहतूक पोलीस तमनर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातातील 11 जखमींवर जिल्हाशासकिय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असुन, पांढरीपुल येथे झालेल्या अपघातात सौमय्या पठाण (वय ३०), खाबरुबी सय्यद (वय ५०), पप्पू रहीम शेख (वय ३०), अरबाज लतीफ पठाण (वय २२), संगीता गव्हाणे (वय २४), सुमन साळवे (वय ३५), उषा वंदाते (वय ३५), सायमा रज्जाक (वय १८), प्रियंका वाघमारे (वय २४), जास्मिन शेख (वय २४) व राणी गणेश भोकळ (वय १८), अशा 11 अपघात ग्रस्तांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. पांढरी पूल परिसरात दर आठवड्यात दोन ते तीन अपघात होत असतात. सोमवारच्या भीषण अपघातानंतर हरिभाऊ भवर, शिवराज काळे, वैभव खडांगळे यांनी संताप व्यक्त केला आहे. अपघात रोखायचे असल्यास येथे उड्डाणपूल होणे आवश्यक असल्याचे सांगत उपाय योजना न केल्यास उपोषणाचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे.