आमदार रोहित पवार यांचा साई संस्थानाला अप्रत्यक्ष टोला 

अहमदनगर : 

आज तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शिर्डीतील पेहरावाचा मुद्दा चांगलाच चघळला गेला आहे.  या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. देवळात येताना काय कपडे घालायचे, हे लोकांना कळते, असे सांगत रोहित पवार यांनी  साई संस्थानाला अप्रत्यक्षरित्या खडे बोल सुनावले आहेत. 

रोहित पवार यांनी गुरुवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  यावेळी त्यांना शिर्डीत साई संस्थानाकडून लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलकाविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली.  त्यावर रोहित पवार यांनी साई संस्थानाला अप्रत्यक्षरित्या फटकारले आहे.  मंदिरात जाताना कोणते कपडे घालावेत, हे आपल्या देशाची संस्कृती सांगते. लोकांना ही गोष्ट कळते. मात्र, तरीही आपण मंदिरात फलक लावणार असू तर ती गोष्ट योग्य नाही. भारतीय संविधानात तसे सांगितले आहे, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.