अपहृतांना सोडा, युद्ध थांबवतो : बेंजामिन नेतान्याहू यांचे हमासला आवाहन
हमासच्या ताब्यात अद्यापही १०१ अपहृत
हमासचा म्होरक्या याह्या सिन्वर याला हल्ल्यात ठार मारल्यानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज प्रथमच गाझा पट्टीतील नागरिकांशी संवाद साधत युद्ध थांबविण्याची तयारी दर्शविली. ‘हमासने शस्त्र खाली ठेवून अपहतांना आमच्या ताब्यात दिल्यास युद्ध उद्याच थांबू शकते,’ असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. मात्र, असे झाले नाही तर आमच्यासाठीही युद्ध संपलेले नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नेतान्याहू यांनी ‘एक्स’वर व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. “याह्या सिन्वर मेला आहे. राफामध्ये आमच्या शूर सैनिकांनी त्याचा खातमा केला आहे. गाझामधील युद्धाचा हा शेवट नसला तरी शेवटाची ही सुरुवात आहे. गाझामधील लोकांसाठी माझा साधा संदेश आहे- युद्ध उद्याही थांबू शकते. हमासने शस्त्र खाली ठेवली आणि अपहरण केलेल्या आमच्या नागरिकांना परत केले तर असे होऊ शकते,” असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. हमासच्या ताब्यात अद्यापही १०१ अपहृत असून त्यापैकी २३ जण इतर देशांचे नागरिक आहेत, असेही नेतान्याहू यांनी सांगितले. या सर्वांना माघारी आणण्यासाठी इस्त्राईल कटिबद्ध असून त्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची आमची तयारी आहे, असा इशाराही नेतान्याहू यांनी दिला आहे. तसेच, आमच्या नागरिकांना इजा पोहोचल्यास आम्ही तुम्हाला शोधू आणि ठेचून काढू, असाही दम नेतान्याहू यांनी हमासला भरला आहे. करत असलेल्या इस्त्राईलविरुद्धच्या लढाईने एका नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे, असा इशारा देत हिज्बुल्ला संघटनेने संघर्ष कायम ठेवण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यांनी आज इस्त्राईलच्या उत्तर भागात रॉकेटद्वारे मारा केला. इस्त्राईलच्या कारवाईत गुरुवारी मारला गेलेला याह्या सिन्वरच होता, असा दावा इस्त्राईलने केला असला तरी हमासने या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. मागील वर्षों सात ऑक्टोबरला हमासने इस्त्राईलवर केलेल्या हल्ल्याचा सूत्रधार सिन्वरच होता.