अहमदनगरमध्ये कांद्याचे कोसळलेले भाव, दूध दरात झालेल्या कपात निषेधार्थ खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी म्हणजे पाच तारखेला शेतकरी, जन आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. शासनाने दुधाला चाळीस रुपये हमीभाव द्यावा अशी मुख्य मागणी होत आहेत. राज्य शासन आणि दुधविकास मंत्री यांच्या दुर्लक्षामुळे हे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशाद्वारात जवळच जनावरे बांधली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून संध्याकाळी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन आंदोलकांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला. गुलमोहर रस्त्याने, सुरभी हॉस्पिटल, डीएसपी चा चौक, स्टेट बँक चौक चांदणे चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून, टिळक रोडने दिल्लीगेट, अप्पू हत्ती चौक,लालटाकी, पत्रकार चौक, डीएसपी चौकातून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चाचा समारोप झाला. राज्यातील शेतकरी, राजकीय नेते या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शेतकरी गळ्यात कांद्याच्या माळा घालून या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.