निमगाव वाघा येथे होणाऱ्या सातव्या काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार निलेश लंके
तर अध्यक्षपदी पांडुळे, कार्याध्यक्षपदी कवियत्री आल्हाट व प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी बुगे यांची निवड
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रविवार दि.12 जानेवारी रोजी सातव्या काव्य संमेलन रंगणार आहे. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार निलेश लंके, कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, कार्याध्यक्षपदी कवियत्री सरोज आल्हाट व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती काव्य संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.
खासदार निलेश लंके म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून सामाजिक संवेदना जपून कार्य सुरु आहे. संस्थेने सलग सातवे काव्य संमेलनाचे आयोजन करुन नवोदित कवींना प्रोत्साहन व नावाजलेल्या कवींसाठी एक व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. कवीच्या काव्यातून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते, फक्त काव्य करुन न थांबता समाजाला दिशा देण्याचे कार्य देखील कवी आणि साहित्यिक करीत असतात. हे काव्य संमेलन समाजासाठी स्फुर्ती व प्रेरणा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, ग्रामीण भागात साहित्य चळवळीला प्रोत्साहन देण्याचे काम पै. नाना डोंगरे आपल्या विविध संस्थेच्या माध्यमातून करत आहे. आजची पिढी वाचनापासून दुरावली जात असताना, गाव पातळीवर होणारे काव्य संमेलन पुन्हा वाचनाकडे युवकांना घेऊन जाणार असल्याची भावना व्यक्त केली.
कवियत्री सरोज आल्हाट यांनी काव्यातून जीवनाचे अंतरग बहरत असते. काव्य दुसऱ्यांसाठी मार्गदर्शक व स्फुर्ती देणारा ठेवा आहे. समाजातील प्रश्नांची धग काव्यातून समोर येत असल्याने काव्य समाज जागृतीचे देखील माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांनी काव्य संमेलनास शुभेच्छा दिल्या.
काव्य संमेलनाच्या विविध पदावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे संमेलनाच्या अध्यक्षा अनिता काळे, माजी अध्यक्ष ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, कवी गिताराम नरवडे, गझलकार रज्जाक शेख, माजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, कवी आनंदा साळवे, मा. प्रा. शंकरराव चव्हाण, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, मिराबक्ष शेख, सिमा गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. काव्य संमेलन यशस्वी होण्यासाठी युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे-खोडदे, सचिन जाधव, गौतम फलके, अक्षय ठाणगे, ऋषीकेश बोडखे, छाया वाबळे, कांता वाबळे, किरण ठाणगे, देविदास आंबेकर, प्रियंका डोंगरे-ठाणगे परिश्रम घेत आहे. तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.