विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेत नगरच्या ओम सानपने पटकाविला प्रथम क्रमांक

पुण्याची मक्तेदारी मोडीत काढून यश मिळवणारा जिल्ह्यातून ठरला पहिला खेळाडू

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विभागीय शालेय स्पर्धेत अहिल्यानगर शहराचा खेळाडू ओम घन:श्‍याम सानप यांने उत्कृष्ट कामगिरी करून पुणे विभागात 19 वर्ष वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. या विभागीय स्पर्धेत पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर व अहिल्यानगर शहर आणि ग्रामीणच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. पुण्याची मक्तेदारी मोडीत काढून प्रथम क्रमांक मिळविणारा ओम अहिल्या जिल्ह्याचा पहिला खेळाडू ठरला आहे.
ओम ची मुंबई येथे होणाऱ्या शालेय राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ओम पाऊलबुद्धे ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असून महावीर योगा व मल्लखांब ट्रेनिंग सेंटरचा खेळाडू असून तो उमेश झोटिंग, अप्पा लाढाणे, प्रणिता तरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका क्रांती सानप व राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे खजिनदार तथा क्रीडा मार्गदर्शक घनश्‍याम सानप यांचा तो मुलगा आहे.
ओमच्या या यशाबद्दल पाऊलबुद्धे कॉलेजचे प्राचार्य भरत बिडवे, क्रीडाशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार शितोळे, अमोल काजळे, शरद सानप, प्रसाद सामलेटी, अंबादास शिंदे आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.