पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने टक्केवारी महापालिकेची अब्रू दिल्लीगेटच्या वेशीवर टांगण्याचा प्रस्ताव

रस्त्यावरील खड्डे बुजवून, नागरी सुविधा द्या., अन्यथा महापालिकेचे नामांतर लोकशाहीतील कृष्णविवर करण्याची घोषणा....

अहमदनगर  (संस्कृती रासने)

 

संपुर्ण शहराचे रस्ते खड्डेमय बनले असताना महापालिकेचा भोंगळ व टक्केवारीचा निकृष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. महापालिकेच्या माध्यमातून तातडीने सर्व रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा येत्या पंधरा दिवसात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महापालिकेची अब्रू दिल्लीगेटच्या वेशीवर टांगून, महापालिकेचे नामांतर लोकशाहीतील कृष्णविवर महानगरपालिका करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती ऍड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.

महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या अंदाजपत्रकातील निधी रस्त्यांवर खर्च केला जातो. निकृष्ट दर्जाचे रस्ते दर पावसाळ्यात खराब होत असून, या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. ऍड. कारभारी गवळी खड्डेमय रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. महापालिकेत टक्केवारीच्या भ्रष्टाचाराने चांगल्या दर्जाची कामे होत नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

 

 

शहरात एक रस्ता चांगला राहिलेला नाही. ग्रामपंचायत सारखा कारभार सध्या महापालिकेचा तर खेड्याचे स्वरुप शहराला आले आहे. महापालिका प्रशासनाने कायद्याला गुंडाळून त्याची पोथी केली आहे. अंदाजपत्रकातील निधी आणि नागरी सुविधा गिळंकृत करणारी कृष्णविवर महापालिका बनली असल्याचे ऍड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. महापालिकेत कायदा नावाचा प्रकार राहिलेला नाही. पुर्णत: अनागोंदी कारभार सुरु आहे. अनेक पक्के बांधकाम पाडण्याचे नोटीस बजावून देखील ते हटविण्यात आलेले नाहीत. तसेच आर्थिक हित साधून फाईव्ह जी मोबाईल टॉवरला परवानगी देण्याचे प्रकार महापालिकेत घडत आहे.  नागरिक फक्त घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर टॅक्स भरण्यासाठी राहिले आहेत. त्या मोबदल्यात त्यांना नागरी सुविधांचा अधिकार मिळत नसल्याचे अशोक सब्बन यांनी म्हंटले आहे.